Posts

Showing posts from June, 2020

आत्मपरीक्षण

Image
महाराष्ट्र टाइम्स ई-पेपर लिंक - https://maharashtratimes.com/editorial/column/introspection/articleshow/76531777.cms https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0

गोष्ट एका शाळेची (22)

गोष्ट एका शाळेची (22) आठ पंधरा दिवसातून एकदा तरी ऑल आसाम स्टुडंट्स यूनियन किंवा उल्फा तर कधी आणखी कुठली संघटना ‘आसाम बंद’ चे आवाहन करायची. त्यादिवशी शाळा-कॉलेजेस, बाजार आणि वाहतूक सर्वच बंद असायचं. मुळातच  इथे वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने किंवा मुसळधार पाऊस- पूर यामुळे शाळांना खूप सुट्या असायच्या. 28 फेब्रुवारीला  उल्फाने आसाम बंद घोषित केला. पुढच्या महिन्यात परीक्षा आणि  एप्रिल महिन्यात  बिहु सणाची मोठी सुटी द्यावीच लागणार होती. कारण वैशाख महिन्यातला बिहु हा आसामी लोकांचा सगळ्यात मोठा सण असतो. त्याला बोहाग बिहु म्हणतात. मुलांना घरी परत नेतांना पालकांनी विचारलं, “दीदी, उद्या आसाम बंद आहे. म्हणजे शाळेला सुट्टी ना ?” “हो, घेऊ शकता. पण मग बिहुची सुट्टी कमी करेन. आधीच या महिन्यात खूप सुट्ट्या झाल्यात. आपल्या शाळेतली मुलं बालवाडीतली आहेत. त्यांचं फार नुकसान होणार नाही. पण असे जर आपण ऊठसूठ आसाम बंद ठेवायला लागलो तर मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे किती नुकसान होईल याचा कुणी विचार करतं का ? बाजार आणि वाहतूक बंद झाल्याने या राज्याचे आर्थिक नुकसान किती होतंय? माझी तर अजिबात इच्छा नाही उद्या

गोष्ट एका शाळेची (21)

गोष्ट एका शाळेची (21) शाळेत अखेर  पाण्याचा नळ लागला. दोन गोष्टींसाठी मला खूप आनंद झाला.  ‘भगिरथ प्रयत्न’ म्हणजे काय हे  खऱ्या अर्थाने या नळ प्रकल्पामुळे मला समजलं आणि मी मनोमन त्या भगिरथ राजाला प्रणाम केला. स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणतांना त्याचे कष्ट काय असतील त्याची छोटीशी झलक  मला गोलाघाट नगरपालिकेने दिली. त्यांनाही धन्यवाद. भगिरथ प्रयत्ना शिवाय भारती ठाकूरला आयुष्यात दूसरा पर्याय नाही हा पण एक साक्षात्कार या निमित्ताने झाला. दुसरं आनंदाचं कारण म्हणजे  गोलाघाटला धनसिरि नदी  जिला मी धनश्री म्हणते तिच्यातून पाणी पुरवठा होतो. धनश्री नदीचं - माझं मैत्र तर मी गोलाघाटला आल्यापासूनच  जुळलं होतं. अधून मधून मी तिला भेटायला जायचे. तिच आता या नळाच्या माध्यमातून का होईना माझ्या शाळेत आली होती. आपल्या मैत्रीचा प्रत्यय तिने दिला.  नळाखाली पहिली ओंजळ भरतांना धनश्री नदीला स्मरत *“गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥”  * हा श्लोक म्हणायला विसरले नाही. माझ्या या शाळेतल्या मुलांच्या आरोग्याची काळजी  तुम्ही सर्वांनी घ्यावी अशी विनवणी करत त्या पहिल्या ओंजळीन

गोष्ट एका शाळेची (20)

गोष्ट एका शाळेची  (20) शाळेत मुलांची मस्ती, गाणी शिकण्यातला उत्साह हे सगळं वाखणण्या सारखं होतं. सुरुवातीला  मी त्यांच्याशी फक्त इंग्लिश मध्येच बोलायचे आणि ते माझ्याशी आसामी भाषेत. इंग्लिश बोलायलाही मुलं  फार लवकर शिकली . बहुधा त्यांना मी शिक्षिकेपेक्षाही मैत्रीण जास्त वाटत असावी. बरेचदा ही मुलं आपल्या आईवडलांबरोबर बांधकाम बघायला संध्याकाळी येत. तिथले वाळूचे ढिगारे हे त्यांचे खेळाचे आवडते ठिकाण. तिथे दाट झाडी देखील होती. लपंडाव खेळायला मजा यायची. मनदीपच्या वडलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. एकदा त्यांनी भरपूर जुने टायर्स आणून दिले आणि चांगल्या जाडजूड दोराने झाडाला झोक्यासारखे बांधून देखील दिले. सोनाने मुलांसाठी एक छोटा बोगदा जमिनीखालून तयार करून दिला. उड्या मारायला एक वाळूचा खड्डा (sand pit) पण तयार झाला.  एक दिवस मुलांकडून सूचना आली की आपण इथेच शाळा भरवली तर ? “रोज तर शक्य नाही पण आठवड्यातून एकदा भरवू शकतो. याल तुम्ही ?”  त्या दिवशी गाणी, खेळ, गोष्टी आणि डबा खाऊन झाल्यावर डॉ बॅनर्जीकडे जाऊन त्यांची बाग बघायची आणि प्राण्यांची एखादी फिल्म पहायची असा कार्यक्रम सुरू झाला. अर्थात पाऊस सुर

गोष्ट एका शाळेची (19)

काही वाचकांनी ‘गोष्ट एका शाळेची’ या लेखमालेतील ‘सखी’ आणि ‘रिचर्ड बाख’ कोण असा प्रश्न केलाय. ‘सखी’ हा माझ्या अंतर्मनाशी झालेला संवाद आहे आणि रिचर्ड बाख हा माझ्या आवडत्या इंग्लिश लेखकां पैकी एक.. गोष्ट एका शाळेची (19) विवेकानंद केंद्राचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी श्री बाळकृष्णनजी आणि डिब्रुगढचे आर्किटेक्ट श्री राय बरूआ यांना घेऊन दिमापूर केंद्राचा कार्यकर्ता मनोहर गोलाघाटला आला. मला थोडं दडपण होतं की आतापर्यंत झालेल्या बांधकामाबद्दल श्री राय बरूआ काय प्रतिक्रिया देतील ? इमारतीचा पाया पूर्ण होऊन भिंतीचे बांधकाम सुरू झाले होते. श्री राय बरूआ यांनी बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि मी निश्चिंत झाले. सोनाला फक्त लेबर कॉंट्रॅक्ट दिले होते. बांधकामासाठी लागणारे सर्व सामान मलाच आणून द्यावे लागायचे. धावपळ खूप व्हायची. सततच्या तापामुळे थकवा पण खूप असायचा. आपल्याला एखादे दुचाकी वाहन मिळाले तर ? गोलाघाटचे त्या काळातले रस्ते लक्षात घेता लूना नावाची मोपेड जास्त सोयीची होती. मी जरा दबकतच हा विषय श्री बाळकृष्णनजी यांच्याकडे काढला. पण क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, “लगेच घेऊन टाक. तुला स

गोष्ट एका शाळेची 18

गोष्ट एका शाळेची 18 डॉ रॉबिन बॅनर्जी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या फुलपाखरांवरच्या डॉक्युमेंटरीसाठी पुन्हा मेक्सिकोला जायचे आहेत. अजून तिकीट काढून झाले नाही. हे सांगण्यासाठी त्यांनी आज मला खास बोलावलं होतं. त्यांना आवडणारा मुरमुऱ्यांचा चिवडा मी आठवणीने बरोबर घेतला. आम्ही लहानपणी मुरमुरे चहात टाकून खात असू तसे ते आता सुद्धा खातात. कधी कधी मलाही खायला लावतात.  आज रॉबिनदा  जरा निवांत होते त्यामुळे त्यांच्या काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानाच्या आठवणींमध्ये खूप रमले. जखमी किंवा अनाथ  झालेली गेंडयाची किंवा इतर जंगली प्राण्यांची पिल्लं  ते गोलाघाटला त्यांच्या घरी घेऊन येत. त्यांचं संगोपन करत आणि ती बरी झाली की पुन्हा जंगलात सोडत. त्यांच्या बंगल्याच्या आसपासचा परिसर इतका मोठा आणि दाट झाडी असलेला होता की या पिल्लांना ते जंगलच वाटावं. शिवाय  चारही बाजूंनी सुरक्षित. आता मात्र कुठलाही वन्यप्राणी घरी ठेवणे हे कायद्यानेच प्रतिबंधित आहे. असे प्राणी आता पाळता येत नाहीत याचे त्यांना दु:ख होतं.  “ पण  कायदा आपणच पाळायला हवा ना भारती” असंही ते लगेच म्हणायचे.  “भारती,काझीरंगा अभयारण्यावर - खास करून त्यातल्या ए

गोष्ट एका शाळेची (17)

गोष्ट एका शाळेची  (17) शाळा सुटल्यावर जेवण करून मी जरा निवांत बसले होते.  जन्मभूमी  नावाचे आसामी भाषेतील स्थानिक  वर्तमानपत्र  मी तेव्हा विकत घेत असे. त्यातलं  फार काही कळत होतं असं नाही. पण  त्या निमित्ताने आसामी  भाषा  शिकता येईल असे वाटायचे.  रेडिओ पण विकत घेतला होता. त्यावर  दिब्रुगड आकाशवाणी  केंद्र लागायचे.  आसामी भाषा  ऐकायला गोड.  तोंडात  रसगुल्ला ठेवून  बोलत आहेत की काय असे वाटते. ‘स’ चा उच्चार ते ‘ह’ असा करतात. त्यामुळे ‘आता आपण सुगम संगीत ऐका.’  हे वाक्य ‘एतिया आपुनी हुगम हंगीत हुणीबो’ असं होतं. अशी काही मजेदार वाक्य  रेडिओवर  ऐकली की  मी स्वत:शीच खूप हसायचे. त्या दिवशी रेडिओवर गाणी ऐकत असताना डॉ बॅनर्जींचा  माळी जगदीश आला. “दीदी, साहबने आपको बुलाया है |” असं काही  बोलावणं  आलं  की कशासाठी  हा प्रश्न न  विचारता सरळ  डॉक्टरांकडे पोहोचायचे हे धोरण मी ठरवले होते.  त्यांचे वय झाले आहे.  वय वाढले की काळजी आणि चिडचिड  भूमिती श्रेणीने  वाढतात हे मी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत अनुभवले होते. आर्टिलरी सेंटर मध्ये आर्मीच्या लोकांबरोबर काम करताना आपल्यापेक्षा वरिष्ठांशी बोलताना ‘यस

गोष्ट एका शाळेची (16)

गोष्ट एका शाळेची (16) शाळा आणि बांधकाम या दोन वेगळ्या प्रकल्पात दिवस कधी उजाडायचा आणि कधी मावळायचा समजायचं नाही.  अनेक मुलं रविवारी सुद्धा येऊन बसायची. अनन्या नावाची एक चिमूरडी म्हणायची, “ठाऊक आहे मला शाळेला सुट्टी आहे ते.  तू एकटीच आहेस ना म्हणून आलेय तुला सोबत करायला.”  रविवारी जरा निवंतपणा असायचा. माझे लांब सडक केस धुवून सुकवणे आणि वेणी घालणे म्हणजे वेळखाऊ काम असायचं. मी वेणी घालायला लागले की अनन्या धावत यायची, “दीदी, मी घालते तुझी  वेणी” असं म्हणत स्वत: खुर्चीवर बसायची आणि मी जमिनीवर. तिच्या इवल्याशा नाजुक हातात माझे केस मावायचे  नाहीत. पण तिचे हात केसांना लागले की मला आईच्या हातांची आठवण यायची. माझ्या लहानपणी दर रविवारी आई अशीच तेल लावून वेणी घालून द्यायची. पाच दहा मिनिटे माझ्या केसांशी खेळून झालं की अनन्या म्हणायची, “खूप मोठे आहेत तुझे केस. नाही जमत मला तुझी वेणी”.  कुठलाही सण असला की विद्यार्थ्यांच्या घरी हमखास जेवणाचे आमंत्रण असायचे. बिहु सण असला की डबे भरभरून ‘तिल पीठा’ यायचा. पीठा बनवणं हे एक कौशल्य असतं. मला मात्र ते कधी जमलं नाही. पण सरसोंचं तेल वापरुन भाज्या बनवणं आवडायला

गोष्ट एका शाळेची (15)

गोष्ट एका शाळेची (15) सकाळी उठले तेंव्हा ताप चांगलाच होता. थर्मामीटर लाऊन पाहिला तर 102 डिग्री होता. रुमीला बालवाडी सांभाळ - मी डॉक्टरांकडे   जाऊन येते असं सांगायचं ठरवलं. पण  तासाभरात रुमीचा निरोप आला की ती आज शाळेत येऊ शकणार नाही. मी स्वतःशीच हसले. बहुधा देव माझ्या नशिबात  विश्रांती टाकायला लिहायला विसरला   होता. त्याला एखादं विनंती पत्र  लिहून विश्रांती माझ्या खात्यात  लिहायला सांगायची का ? आज रूमी नाही  म्हणजे  मुलांना  सांभाळणं  आणि शिकवणं ओघाने आलंच.  शाळा सुटल्यावर डॉ खोंड यांच्याकडे जाऊन आले. त्यांनी पुन्हा सगळ्या वैद्यकीय चाचण्या  करायला सांगितल्या. त्या गोलाघाट येथे  न करता जोरहाट येथे कर म्हणाले. म्हणजे ताप असताना प्रवास करणे आलेच. गेल्या ऑगस्ट महिन्या पासूनचा हा ताप माझा पिछा कधी सोडणार आहे ठाऊक नाही. सरळ जोरहाटच्या गाडीत बसले. मनात माझ्या  तब्येतीचेच  विचार चालू होते.  अशी हतबलता पूर्वी कधी अनुभवली नव्हती. हाता पाया वरची सूज पण उतरत नव्हती. आतापर्यंतच्या आयुष्यात कधी सर्दी खोकलाही माहीत नव्हता. प्रारब्ध भोग म्हणतात ते हेच का ?  काही  रिपोर्टस् घेऊन मी दुपारी परतले. उरलेले